चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत कोळसा ब्लॉकचा लिलाव करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. ज्याला आता मोठा विरोध होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी एक ट्विट करून चिंताही व्यक्त केली होती. आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठविले आहे. या कोळसा ब्लॉकच्या लिलावाला त्यांनी विरोध दर्शविला आहे.
1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंत जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाला. पुढे ही परिस्थिती आणखी स्फोटक होणार आहे. त्यामुळे आता केंद्राने जाहीर केलेल्या बंदर कोळसा ब्लॉकला आता विरोध होऊ लागला आहे. तीन दिवसांपूर्वी माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी ट्विट करून यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ताडोबाला लागून हा परिसर असल्याने कुठल्याही परिस्थितीत ही कोळसा उत्खनन होऊ नये, अशी मागणी त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली होती. तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनासुद्धा त्यांनी टॅग करून त्यांचे लक्ष वेधले होते. याबाबत त्यांनी आता केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी कोळसा खाणीला विरोध दर्शविला असून कुठल्याही किंमतीत आपण पर्यावरण आणि वन्यजीवांची हानी होऊ देणार नसल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे ताडोबालगतच्या या कोळसा खाणीला विरोध वाढत जाणार असे दिसून येत आहे.