चंद्रपूर - देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जो तो आपल्यापरीने मदतीचा हात पुढे करत आहे. अशात शिक्षणासाठी झटणारे हात समाजसेवेसाठी सरसावले आहेत. राजूरा येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने तब्बल १२ हजार मास्कची निर्मिती केली आणि तेलंगणा सीमेवरील आदिवासी गावातील नागरिकांना, कामगार, मजूरांना या मास्कचे वितरण करण्यात आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. संचारबंदीमुळे स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. या मजुरांना प्रशासनासोबत स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला आहे. जिल्ह्यातील राजूरा येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत येणाऱ्या शिवाजी विद्यालयाच्या इमारतीमध्ये स्थलांतरित मजूरवर्ग थांबलेला आहे. यात वेगवेगळ्या राज्यातील 128 नागरिक आहेत. त्यांच्या देखभालीसाठी शाळा व महाविद्यालयाचे कर्मचारी काम करत आहेत.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर राज्यात मास्कचा तुटवडा आहे. त्यामुळे, कामगार, मजूरांना मास्क सहज उपलब्ध व्हावे यासाठी महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. शिवाजी महाविद्यालयातील गृह, अर्थशास्त्र व एनएसएस विभागाने 12 हजार मास्क निर्मितीचे ध्येय पुढे ठेवले. दररोज 20 ते 25 विध्यार्थी आठ ते दहा तास महाविद्यालयात आणि घरी मास्क निर्मिती करत होते. आत्तापर्यंत सहा ते सात हजार मास्कची निर्मिती झाली असून गरजूंना मास्कचे वितरण करण्यात आले आहे.
शिक्षक आणि विध्यार्थांच्या या सामाजिक उपक्रमाला तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्थेचे कार्याध्यक्ष सुधाकर कुंदोजवार, सचिव अविनाश जाधव, अॅडव्होकेट मुरलीधर धोटे, श्रीधरराव गोडे, दत्तात्रय येगीनवार, जसविंदर धोत्रा, अॅडव्होकेट संजय धोटे, दौलतराव भोंगळे, साजिद बियाबानी, प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, उपप्राचार्य डॉ. राजेश खेरानी यांच्या मार्गदर्शनाखाली गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. वनिता वंजारी, प्राध्यापिका प्रीती सुभारे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.
मास्क निर्मिती करताना प्रशासनाचे सर्व नियम पाळले जात आहेत. सोशल डिस्टन्स राखून विद्यार्थी सामाजिक भावनेतून कठीण प्रसंगात हातभार लावण्यासाठी पुढे आले आहेत. यात बालाजी ताजने, पल्लवी वराठे, अर्चना लेकलवार, दिक्षिता वर्मा, आनंद भटाळकर, सिमरन शेख, फिरोज अहमद, शुभम दिकुंडवार, दीपक राजूरकर, कला बोबडे, रोशनी टेकाम, अंजली टेकाम, नेहा शेख, विजया रागीट, शिवाजी बल्की अर्थ फाउंडेशनचे डॉ. मोरे यांचे सहकार्य लाभले आहे.