चंद्रपूर - कोरोनामुळे देश टाळेबंद आहे. जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने राजुरा पोलिसांनी आज (11 एप्रिल) सकाळी दहा ते साडेबारा दरम्यान नाकाबंदी केली. यात मोटर वाहन कायद्याअंतर्गत 110 दुचाकी वाहन धारकांवर कारवाई केली. यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसला आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देश 21 दिवस टाळेबंद आहे. जिल्ह्यात अंतर सीमा व राज्य सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येत आहे. शहरात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आलेली आहेत. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका. प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. मात्र, नागरिकांच्या वाढत्या गर्दीवर आळा घालण्यासाठी राजुरा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव व ठाणेदार नरेंद्र कोसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दोन तास नाकाबंदी केली. यात शेकडो वाहने विनापरवाना आढळली. तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्यांतर्गत नागरिकांवर कारवाई करून वाहने चालन करण्यात आली. काही वाहनांना जप्त करण्यात आले, अशी माहिती ठाणेदार नरेंद्र कोसुरकर यांनी दिली.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवेसाठी वाहनांचा वापर करावा. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तूंसाठी दिलेल्या वेळापत्रकात नुसारच नागरिकांनी आदेशाचे पालन करावे. गर्दी टाळावी आणि सोशल डिस्टन्स चे नियम पाळावेत, असे कोसुरकर म्हणाले.