चंद्रपूर : भानापेठ (जटपुरा गेट) परिसरात माजी नगरसेवक अनुप पोरेड्डीवार यांचे दारूचे दुकान आहे. याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर श्री बिअर बार सुरू झाले. या वॉर्डचे निवासी गेल्या तीस वर्षांपासून कपडे, ड्रायक्लीन, प्रेसचा व्यवसाय करत आहे. या परिसरात परीट समाजासह अनेक जाती धर्माचे लोक राहतात. या गल्लीच्या परिसरात दारुबंदी पूर्वी माजी नगरसेवक अनुप पोरेड्डीवार यांचे वाईन शॉप होते. मुख्य मार्गाच्या दिशेने हे दुकान असल्याने वार्डवासियांना त्रास नव्हता. त्यानंतर जिल्ह्यात दारुबंदी उठल्याने त्याच इमारतीत दोन मजले काढून श्री बारअँड रेस्टॉरंट सुरू केले.
बारवर कारवाई करावी : परमिटरूमसाठी किमान 30 फुटाचा रोड असणे गरजेचे आहे. मात्र, प्रवेशद्वार असलेल्या मार्ग केवळ 10 ते 15 फूट इतकेच आहे. त्याच प्रमाणे पार्किंग सुविधा नसल्यामुळे गाड्या रोडवर असतात. त्यामुळे गल्लीत जाण्यासाठी नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनुप पोरेड्डीवार यांनी परमिट रूम सुरू करण्यापूर्वी तेथील नागरीकांना कुठलीही माहिती दिली नाही, असे त्यांचे विशेष म्हणजे अवघ्या काही फुटावर बारच्या द्वाराच्या बाजूला इतर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. त्यामुळे या बारवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
दारुड्यांचा हैदोस : या गल्लीत रात्री उशिरा पर्यंत दारुड्यांचा हैदोस असतो, येथे गलिच्छ, अश्लील शिवीगाळ केली जाते, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तळीरामांचा येथे ठिय्या असल्याने कुठलाही सामान्य नागरिक महिला आता रस्त्यावरून येजा करण्यास घाबरतात. त्यातही मुली, महिलांना बाहेर निघणे कठीण झाले आहे. असे निवेदनात म्हटले आहे. यामुळे त्यांचा संपूर्ण व्यवसाय ठप्प पडला आहे. या वातावरणामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बारचा नव्याने पोलीस अहवाल मागणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी त्यांनी केली आहे. नवा अहवाल आल्यानंतरच निर्णय घेण्यात यावा. मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह अवघ्या काही अंतरावर असताना बारला परवानगी दिली कशी हा प्रश्न आहे. त्यामुळे या बारची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात पूजा शेरकी, जिल्हा संघटक सरस्वती गावंडे, छायाताई चौधरी, किरण जूनाघटी तसेच या वॉर्डातील महिलांनी दिले.