चंद्रपूर - पती पत्नीचे भांडण विकोपाला गेले असता क्रूर पतीने पत्नीच्या अंगावर डिझेल टाकून तिला ( Husband set his wife on fire in sushi ) जाळल्याची घटना मूल तालुक्यातील सुशी या गावात आज घडली. पत्नीचा उपचारासाठी नेताना वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. मुक्ताबाई शेंडे ( वय 65) असे मृत पत्नीचे नाव आहे.
हेही वाचा - आदिवासी युवकांना मारहाण प्रकरणी राजू झोडे आणि वनविभाग आमनेसामने
आरोपी गंगाराम शेंडे ( वय 68 ) याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन येत असल्याने घरात त्याची पत्नी मुक्ताबाई शेंडे यांच्याशी त्याचा नेहमी वाद व्हायचा. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो नेहमी भांडण आणि मारहाण करायचा. काल मंगळवारी दुपारी दोन वाजता या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात गंगारामने मोटार पंपाकरिता आणलेले डिझेल पत्नी मुक्ताबाई यांच्या अंगावर ओतून आगपेटीने आग लावली. मुक्ताबाई यांनी आरडा ओरडा केली असता शेजाऱ्यांनी धावत येऊन आग विझवली. मात्र या दरम्यान त्या गंभीररित्या जळाल्या होत्या.
मुक्ताबाई यांना मुल येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले. परंतु, जळल्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले. नेत असताना वरोरा जवळ त्यांचा मृत्यू झाला. मुक्ताबाई यांच्या मृतदेहाचे मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले. मूल पोलिसांनी आरोपी गंगाराम शिंदे याला अटक केली असून, मुल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा - Tigress Found Dead in Bhadravati : भद्रावती तालुक्यात वाघिणीचा मृतदेह आढळला; करंट देऊन मारल्याचा संशय