चंद्रपूर - जिल्हाधिकारी कार्यालयात रखडलेल्या शेतीसबंधीच्या प्रकरणावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्याने राजुरा-असिफाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. त्यामुळे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी घटनास्थळ गाठून शेतकऱ्याला ताब्यात घेतले आणि तासाभरानंतर मार्ग मोकळा केला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यात घडली आहे. वारलू निरंजने असे शेतकऱ्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा... चक्रीवादळासाठी जनतेने घाबरून जाऊ नये, योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे - विजय वडेट्टीवार
राजुरा तालुक्यातील वरुर (रोड) येथील वारलू निरंजने या शेतकऱ्याचे शेतीसंबंधीचे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. त्यामुळे संतप्त झालेल्या निरंजने याने राजुरा-असिफाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरुर (रोड) येथे बैलगाडी, थोर पुरुषांचे फोटो व दोर बांधून एक तास मार्ग रोखून धरला. या दरम्यान दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती राजुरा पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. मार्गावर ठेवलेले महापुरुषांचे फोटो, बैलगाडी व दोरखंड हटवून मार्ग मोकळा केला. या प्रकरणी शेतकरी निरंजने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निरंजने याला जामीन मिळाला आहे.