चंद्रपूर- राजुरा तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या अनेक तुकड्या गस्त घालत असतानाच पुन्हा वाघाचा हल्ला झाला आहे. माळरानावर चरणाऱ्या गायींच्या कळपावर वाघाने हल्ला केला असून त्यात एक गाय जखमी झाली, तर घाबरलेल्या सहा गायी इतरत्र पळून गेल्या आहेत.
वाघाने तालुक्यातील दहा शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेतला आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या अनेक तुकड्या गस्त घालत आहेत. मात्र, अद्यापही वनविभागाला वाघ गवसला नाही. दुसरीकडे सतत होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वाघाला गोळ्या घालण्याची मागणी केली आहे.
अशात तालुक्यातील मानोली येथील रमेश महादेव अडवे हे काल (१६ ऑक्टोबर) आपल्या सात गायींना चरण्यासाठी गोवरीपासून जवळच असलेल्या नाला परिसरात घेऊन गेले होते. नाल्यात दबा धरून बसलेल्या वाघाने गायींच्या कळपावर हल्ला केला. यात एक गाय वाघाच्या तावडीत सापडली. मात्र, तिने वाघाच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करून गावाचा रस्ता धरला. तर, इतर सहा गायी या हल्ल्याने गोंधळून इतरत्र पळाल्या. त्या सहा गायी अद्यापही घरी आल्या नाहीत. रमेश अडवे यांनी गावातील काही सोबत्यांना घेऊन गायींचा शोध सुरू केला आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.
हेही वाचा- अतिवृष्टीचा फटका... 'ब्लॅक राईस'च्या प्रयोगावर निसर्गाने फेरले पाणी