चंद्रपूर - जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनेत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. आज सरपण गोळा करण्यासाठी महिला जंगलात गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. वैशाली विलास मांदाडे असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना आज सकाळी मूल तालुक्यातील सुशी दाबगाव या परिसरात घडली.
दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढविला
मूल तालुक्यातील सुशी येथील पंधरा ते सोळा महिला जळाऊ लाकडासाठी मंगळवारी सकाळी गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्या तलावाच्या परिसरात गेलेल्या होत्या. हा परिसर वनविकास महामंडळाच्या चिचपल्ली परिक्षेत्रातंर्गत केळझर बीटात कम्पार्टमेंट नंबर 526मध्ये येतो. हा परिसर घनदाट जंगलाचा असून तलावाचा परिसर असल्याने याठिकाणी वाघाचा मुक्तसंचार आहे. तलावाच्या परिसरात महिला जळाऊ लाकडे वेचत असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने वैशाली मांदाडेवर हल्ला चढविला.
वाघाने फरकटत नेऊन 32 वर्षीय वैशालीला ठार केले
आरडाओरड झाल्याने सरपण वेचणा-या इतर महिलांनी घाबरून जावून गावाच्या दिशेने धाव घेतली. तो पर्यंत वाघाने फरकटत नेऊन 32 वर्षीय वैशालीला ठार केले होते. घाबरलेल्या महिलांनी गावात येऊन ही माहिती देताच गावक-यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेवून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. यावेळी गावकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वनविकास महामंडळाचे वनसंरक्षक सोनूलवार आणि चिचपल्ली परिक्षत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी व्ही. एल. पिंजारी यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेची पाहणी केली.
पंचवीस हजार रूपयाचे सानुग्रह अनूदान
पंचनाम्यानंतर मृत वैशाली मांदाडे हिच्या कुटुंबीयांना तत्काळ पंचवीस हजार रूपयाचे सानुग्रह अनूदान दिले. या घटनेचा पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी व्ही. एल. पिंजारी करीत आहेत. पावसाळा तोंडावर असल्याने ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी जळावू लाकडाची साठवणूक केली जाते. जंगलात जावून लाकडे आणणेच महिलेच्या जीवावर बेतले. वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची मूल तालुक्यातील ही चौथी घटना आहे. यानिमित्ताने मानव वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.