चंद्रपूर - तालुक्यातील चेकबोरगाव येथील एका शेतात 2 रानगव्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकाराने आता वनविभागात चांगलीच खळबळ माजली आहे. वनविभागाने सदर प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
चेकबोरगाव येथील बाबाराव धोंडू मालेकर यांच्या शेतात कापूस वेचणीसाठी महिला गेल्या होत्या. तेव्हा त्यांना 2 रानगवे मृतावस्थेत आढळून आले. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रानगव्याचा मृत्यू विद्यूत प्रवाहाने झाला की अजून दुसऱ्या कारणाने ?याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा - सरसकट कर्माफीचे काय झाले? सरकारला सवाल करत विरोधकांचा सभात्याग
तर शवविच्छेदन करण्यासाठी चंद्रपूरहून वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. वनवैभवाने संपन्न गोंडपिपरी तालुक्यात विविध प्रकारचे दुर्मीळ प्राणी आढळून येत असतात. कालच झरण मार्गावर एक रानगवा रस्ता ओलांडताना आढळला होता. बोरगाव चेकबोरगाव आणि खराळठेच्या जंगलात यापूर्वी कधीच रानगव्यांचा वावर नव्हता. अशावेळी पहिल्यांदाच रानगव्याची जोडीच मृतावस्थेत आढळली आहेत.