चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील किटाळी तुकुम येथील सम्यक चंद्रशेखर पाटील नामक विद्यार्थी मित्रांसोबत पोहायला गेला होता. गावानजीकच्या हत्तीगोटा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहायला गेल्यानंतर त्याचा प्रवाहात बुडून मृत्यू झाला आहे. तो जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत सातव्या वर्गात शिकत होता.
पाण्याच्या वाढत्या प्रवाहात पोहता न आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. संबंधित घटना सकाळी ११.१५ च्या सुमारास घडली.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अद्याप शाळा बंद आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी पोहण्यासाठी बंधाऱ्यावर गेले होते. अचानक प्रवाह वाढल्याने सम्यकचा तोल गेला;आणि पाण्याचा प्रवाहात वहिला. दुर्दैवाने सोबतच्या मित्रांनी घाबरून गावात धूम ठोकली. गावात गेलेल्या मुलांनी सम्यक बुडाल्याची माहिती दिली. यानंतर गावकरी घटनास्थळावर धावले. शोधाशोध सुरू असतानाच तो नदी प्रवाहात वाहत येताना दिसला. गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढल्यानंतर संबंधित मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेची माहिती चिमूर पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला असून सम्यकच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.