चंद्रपूर - शहरातील सेवादल वसतीगृहात बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने अभ्यासिकेत गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ काळे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. पाटण येथील रहिवासी असलेल्या या विद्यार्थ्याने सहकारी मित्रांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
वसतीगृहातील सीसीटीव्ही चित्रीकरणानुसार सिद्धार्थ पहाटे पावणेतीन वाजता आपल्या खोलीतून अभ्यासिकेकडे गेला होता. इलेक्ट्रिक तारांचा फास बनवून त्याने स्वत:ला गळफास लावून घेतला. सिद्धार्थला त्याच्या सहकारी मित्रांकडून सतत त्रास सहन करावा लागत होता. याच ठिकाणी सातव्या इयत्तेत शिकत असलेल्या त्याच्या भावाने ही बाब सांगितली.
हेही वाचा - कसा का होईना पण मी चारवेळा उपमुख्यमंत्री - अजित पवार
वसतिगृहाच्या अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मात्र सिद्धार्थला होणाऱ्या त्रासाविषयी कुठलीही कल्पना नाही, असे म्हटले आहे. दरम्यान जिवती या अतिदुर्गम तालुक्यातील पाटण गावात राहणाऱ्या सिद्धार्थच्या आई-वडिलांना वसतीगृहात बोलावण्यात आले.
पोलिसांनी सिद्धार्थचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला असून त्याच्या आत्महत्येसंबंधित विविध गोष्टी तपासल्या जात आहेत. पोलिसांनी सिद्धार्थच्या खोलीची तपासणी केली. त्याच्या खोलीत भिंतीवर लिहलेल्या संदेशाचा अर्थ काय होतो, याचाही पोलीस शोध घेत आहेत. सेवादल वसतीगृहात झालेल्या आत्महत्येने समवयस्क मित्रांची जीवघेणी थट्टा पुढे आली आहे. या प्रकरणात नेमके कोण दोषी आहे, हे शोधून काढणे पोलिसांपुढे आव्हान आहे.