चंद्रपूर - आईवडिलांच्या मारहाणीला कंटाळून अकरा वर्षाच्या मुलीने पळून जाण्याचा निर्णय घेतला. तसेच पोलिसांच्या हाती लागल्यानंतर स्वत:चे अपहरण झाल्याचे तिने सांगितले. मात्र,सखोल चौकशीत संबंधित मुलगी कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून पळाल्याचे समोर आले आहे.
बळवंत मडावी हे नागपूरमधील पारडी नाक्याचे रहिवासी आहेत. गरोदर पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा त्यांचा संसार आहे. घरात एकटेच कमावते असल्याने त्यांनी नागपूर सोडले; आणि चंद्रपूरच्या महाकाली मंदिर परिसरात ठाण मांडले. यानंतर त्यांनी अकरा वर्षाच्या मुलीला महाकाली मंदिर परिसरात भीक मागण्यास सांगितले. तिने विरोध केल्यानंतर आई-वडील मारहाण करायचे. याच जाचाला कंटाळून या मुलीने अखेर पळून जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर ती पुन्हा नागपुरात आली.
आई-वडिलांनी पोलिसात तक्रार केल्यामुळे शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. अखेर त्यांना संबंधित मुलगी नागपूर येथे सापडली. परत आणण्यासाठी गेल्यानंतर या मुलीने स्वत:चे अपहरण झाल्याचे सांगितले. मुलांची तस्करी करणारे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आला. मात्र, तपासात कोणतेही तथ्य आढळले नाही. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली. यामध्ये आईवडिलांच्या त्रासाला कंटाळून पळाल्याचे संबंधित मुलीने सांगितले आहे.