मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्णी रोड स्थानकावर मोबाईल चोराचा पाठलाग करताना चालत्या लोकलच्या वेगाचा अंदाजन आल्याने फलाट आणि लोकलच्या मध्ये सापडून शकील शेख (वय, 53) या प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी जीआरपी पोलिसांनी कारवाई करीत नालासोपारा येथून सत्यम सिंग व शिवम सिंग या दोन जुळ्या भावांना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींवर यापूर्वीही मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
आरोपी सत्यम सिंग हा मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात 4 महिन्यांची शिक्षा देखील भोगून आलेला आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी शिवम सिंग हा शकील शेख प्रवास करीत असलेल्या डब्यात हजर होता. या संदर्भात शकील शेख यांचा चोरी झालेला मोबाईल खरेदी करणाऱ्या फैरुजा खान यालादेखील अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
7 जुलै , रविवारी शकील शेख हे कामानिमित्त सकाळी जोगेश्वरीहून चर्चगेट स्थानकाच्या दिशेने प्रवास करीत असताना, शकील शेख यांच्या बाजूला उभ्या असलेल्या शिवम सिंग याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि चालत्या ट्रेन मधून उडी मारून पळ काढला. मोबाईल चोराचा पाठलाग करताना शकील शेख यांनी सुद्धा चालत्या ट्रेन मधून उडी मारली मात्र त्यांना लोकलचा वाढलेला वेग लक्षात न आल्याने त्यांचा फलाट व ट्रेनच्या मध्ये अडकून मृत्यू झाला. चर्णी रोड रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे.