मुंबई - पश्चिम उपनगरातील प्राचीन गुफा असलेल्या जोगेश्वरी गुफेतील शिवलिंगाच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी आज मोठ्या संख्येने गर्दी केली. यावेळी ढोल-ताशा पथकाने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना रांगोळीच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.
जोगेश्वरी गुफेतील शिवलिंगाला ऐतिहासिक महत्त्व आहे. सध्या ही गुफा पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारितआहे. सुमारे ७ व्या ते ८ व्या शतकात बनवण्यात आलेल्या जोगेश्वरी गुफेत पवित्र शिवलिंग आहे. महाशिवरात्रीनिमित्त आज येथे मुंबईतूनच नव्हे, तर राज्यातूनही अनेक भाविकांनी रात्रीपासूनच दर्शनाला रांग लावली आहे.
या परिसरात राहणारे स्थानिक स्वयंसेवक महाशिवरात्रीच्या दोन दिवसाआधीपासूनच गुफेत तयारीला लागतात. तसेच भाविकांची गर्दी पाहता, गुफा परिसरात कृत्रिम शिवलिंगही तयार करण्यात आले आहे. आज रात्री गुफा परिसर दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघणार आहे.