मुंबई - राज्यात तिहेरी खुनाची तिसरी घडल्याने कायदा व सुव्यवस्थेला मोठा सुरुंग लागला आहे. शिर्डी आणि नागपूर हे तिहेरी हत्याकांडाने हादरले असतानाच नवी मुंबईतही तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. भंगाराच्या गोदामात काम करणाऱ्या तीन कामगारांची झोपेतच हत्या झाल्याने नवी मुंबईत एकच खळबळ माजली आहे. ही घटना तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावात घडली आहे.
तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावात हे भंगाराचे गोदाम आहे. या गोदामात इरशाद ( 20), नौशाद (14), राजेश (28) हे तीन कामगार काम करत होते. तिन्ही कामगारांचा मृतदेह सकाळी 9 च्या सुमारास गोदामात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलीस आणि श्वानपथकाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेत गोदामातील कामगारांवर डोक्यात जड वस्तूचा प्रहार करण्यात येऊन चाकूचे वार करण्यात आले आहेत. हत्येनंतर त्या तिघांचे मृतदेह त्याच ठिकाणी गोदामात लपविण्यात आले होते.
विशेष म्हणजे ज्या भंगाराच्या गोदामात ही घटना घडली ते गोदाम अनधिकृतपणे चालवण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
शिर्डीतही तिहेरी खुनाची घटना आज घडल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी नागपूरमध्ये तिहेरी खुनाची घडल्याने उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.