मुंबई - दिवाळी, मकरसंक्रांत, रंगपंचमी, नागपंचमी, गुढीपाडवा, असे विविध सण वर्षभर उत्साहात साजरे करण्यात येतात. या उत्सवानिमित्त विविध वस्तू बनवून काही कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. लालबाग येथील घनश्याम दहितुले यांचे कुटुंबही विविध वस्तू बनवून उदरनिर्वाह चालवते. आता गुढीपाडव्यानिमित्त त्यांनी नॅनो गुढ्या बनवल्या आहेत.
पूर्वी चाळी होत्या. गुढी लावायला जागा होती. परंतु आता मुंबईत जागा नाही. सगळीकडे इमारती उभ्या आहेत. यामुळे आता छोट्या नॅनो गुढ्यांना खूप मागणी आहे. गेल्या ७ वर्षांपासून आम्ही छोट्या गुढ्या बनवत आहोत. या अगोदर आमचे कुटूंब मोठ्या गुढ्या बनवत होते. आता आमची तिसरी पिढी हे काम करत आहे. गुढीपाडव्यानिमित्त गुढीच्या माध्यमातून १० हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो. अशा प्रकारे विविध प्रकारच्या सणाला लागणाऱ्या वस्तूंच्या माध्यमातून दहितुले कुटूंब उदरनिर्वाह चालवते.
पूर्वीसारखे उंच गुढी उभारण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आता छोट्या गुढ्या उभारून गुढीपाडवा साजरा केला जात आहे. कुटूंब मोठे, वेतन कमी असल्यामुळे घर चालवण्यासाठी लालबाग, वरळी या भागातील काही कुटूंब जसा सण येईल त्यानुसार छोटा व्यवसाय करतात. लालबाग येथे झेंडा गल्लीतील चाळीत राहणाऱ्या दहितुले यांच्या वडिलोपार्जित भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. मोठे कुटूंब असल्यामुळे जोडधंदा करावा, थोडे पैसे कमवता येतील, असा त्यांनी विचार केला. गेल्या ३० वर्षांपासून त्यांचे कुटूंब सणांमध्ये विविध वस्तू तयार करतात. दिवाळीत कंदील, मकरसंक्रांतीत दागिने, नागपंचमीला नाग असे विविध सण आले की, त्यांचे कुटूंब वस्तू बनवण्यास सुरुवात करतात. यावेळी त्यांनी गुढीपाडवानिम्मित छोट्या म्हणजेच नॅनो गुढ्या तयार केल्या आहेत.