मुंबई - दक्षिण मुंबईतील लोकसभा उमेदवारांचा प्रचार चांगलाच जोर धरू लागला आहे. सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरत असले तरी थेट जनसंपर्कावर अधिक भर देण्यात येत आहे. प्रचारातला पहिलाच रविवार आल्याने उमेदवारांनी सकाळी ७ पासूनच भरगच्च कार्यक्रमाची आखणी केली.
शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत मरिन ड्राईव्हवर सकाळीच मतदारांना भेटणार आहेत. दक्षिण मुंबई हा प्रामुख्याने उच्च उत्पन्न गटातील उच्चभ्रू लोकवस्तीचा मतदारसंघ मानला जातो. या मतदार संघात सोसायटीच्या परवानगीशिवाय कोणीही नेता थेट सोसायटीत प्रवेश करू शकत नाहीत. तसेच, रविवार सोडून इतर दिवशी गेल्यास कुटुंबातील सर्व मतदार भेटत नाहीत. त्यामुळे प्रचारासाठी सुट्टीचा शनिवार आणि रविवार अतिशय महत्वाचा मानला जातो.
काँग्रेसचे मिलिंद देवरा सकाळातच्या सत्रात नेपियनसी रोड, कफ परेड, धोबी घाट आणि शहीद भगतसिंग मार्गावर मतदारांना आणि काही सोसायटीच्या सदस्यांना भेटणार आहेत. तर, संध्याकाळी भायखळा रुस्तम बाग इथे स्थानिक राहिवाशांची भेट घेणार आहेत. सोमवारी देवरा आणि सावंत आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.