मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३ वर आज रात्री ९ वाजता लोकल रुळावरुन घसरली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, मध्य रेल्वेची वाहतुक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. जवळपास ५० पेक्षा अधिक गाड्या रद्द केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.
- ११.०० - अप धीम्या मार्गावरील वाहतुक ठप्प
- १०.४५ - सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले, प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय
- १०.२० - मध्य रेल्वेकडून ५० पेक्षा अधिक गाड्या रद्द होण्याची शक्यता
- १०.०० - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
- ९.३० - प्रवाशांची मोठी गैरसोय
- ९.१५ - रेल्वे प्रशासनातर्फे मदतकार्य सुरू
- ९.०० - कुर्ला रेल्वे स्थानकात लोकल रुळावरुन घसरली, कोणतीही जीवितहानी
लोकलचा वेग कमी होता. त्यामुळे रुळावरुन घसरल्यानंतरही प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. लोकल घसरल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने तत्काळ मदतकार्य हाती घेतले आहे. या घटनेमुळे काही काळ लोकलसेवा ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना पायी प्रवास करावा लागला.
आज रविवार असल्याने दुपारपर्यंत मेगाब्लॉक होता. त्यानंतर, आता लोकल घसरल्यामुळे मध्य रेल्वेचे रात्रीचे वेळापत्रक कोलमडले आहे. लवकरच लोकल सेवा पूर्ववत होईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.