मुंबई - देशात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र आचारसंहितेतही तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बी राधाकृष्णन यांच्या जागी सुरज मांढरे यांची नाशिकच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राधाकृष्णन यांची मेरीटाइम बोर्डाच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर विक्रम कुमार यांची पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासकीय सेवेसोबतच पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण प्रतिनियुक्तीवरून राजेंद्र सिंह यांची विशेष कृती दलात अप्पर पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर एस. जगन्नाथ यांचीही प्रतिनियुक्तीवरून राज्य पोलीस मुख्यालयात नियोजन आणि समन्वय विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियोजन आणि समन्वयक पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर यांची धोरण विभागाचे अप्पर महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबईचे पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ यांची वाहतूक विभागात अप्पर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या काळात या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे उलटसुलट चर्चा होत होती. मात्र या बदल्या निवडणूक आयुक्ताच्या परवानगीने झाल्या असून हा आचारसंहितेचा भंग होत नसल्याचे अतिरिक्त निवडणूक आयुक्त दिलीप शिंदे यांनी सांगितले.