मुंबई - उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने एका आरोपीला गुन्ह्यातून सुटका करीत आगळी वेगळी शिक्षा सुनावली आहे. या तरुणाला शिक्षा म्हणून महिनाभर आठवड्यातून दोन दिवस वर्सोवा समुद्र किनारा स्वच्छ करावयाचा आहे.
आपल्याच जवळच्या मैत्रिणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका युवकाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला मैत्रिणीबद्दल अश्लील मेसेज पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. पीडित मुलीच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर तिने ह्या बद्दल पोलिसात तक्रार दाखल केली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात काही दिवस खटलाही सुरू होता. मात्र, आपण आपली तक्रार मागे घेत असल्याचे पीडित तरुणीने न्यायालयात सांगितल्यावर न्यायालयाने या संदर्भात आरोपीला शिक्षा होणे गरजेचे असल्याचे म्हणत मुंबईतील वर्सोवा समुद्र किनारा महिनाभर दर शनिवारी, रविवारी स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावली आहे.
वर्सोवा समुद्र किनारा स्वच्छता मोहीम चालविणारे आफ्रोज शहा यांच्या पथकात राहून या तरुणाला महिनाभर दर शनिवारी व रविवारी समुद्र किनारा स्वच्छ करावा लागणार आहे.