मुंबई - गेले दोन वर्षे विधीमंडळ अधिवेशनाच्या आधी मंत्री मंडळ विस्ताराच्या चर्चा झडत होत्या, मात्र यासंदर्भात कधीही मुख्यमंत्र्यांनी थेट उत्तर दिले नाही. आता पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर नक्की मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकी संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी मंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याविषयी काहीही सांगितले नाही. काँग्रेसमधून भाजपच्या वाटेवर असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर त्यांना विस्तारात संधी मिळण्याची दात शक्यता आहे. पुण्यातून लोकसभेवर निवडून गेलेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा विभाग पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या कडे दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच बापट यांच्याकडे असलेले पुण्याचे पालकमंत्री पद महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे. तर चंद्रकांत पाटील यांचे कडे असलेले जळगावचे पालकमंत्री पद मुख्यमंत्र्यांच्या निकट असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे. त्यामुळे महाजन यांच्यावर नाशिक आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यांचा कारभार हाती आला आहे.