मुंबई - सत्तेचा गैरवापर करुन केंद्रातील आणि महाराष्ट्रातील भाजप सरकारने कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र रचले आहे. भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीने कळस गाठला असून आज रेनिसन्स हॉटेलमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरणच केले आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
कर्नाटकातील काँग्रेस आमदारांचे अपहरण करुन त्यांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये डांबण्यात आले आहे. काँग्रसचे नेते आणि कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार हे या आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत आले असताना त्यांना भेटू दिले नाही. त्याच हॉटेलमध्ये शिवकुमार यांनी स्वतःसाठी खोली आरक्षित केली होती. तरीही पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्ये जाऊ दिले नाही. स्वपक्षाच्या आमदारांना भेटण्यात गैर काय आहे? पण भाजप सरकार एवढ्यावरच न थांबता पोलीस दलाचा गैरवापर करत आहे.भाजपची शिवकुमार यांच्यासह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा आणि माजी मंत्री नसीम खान यांना अटक करण्यापर्यंत मजल गेली आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे सरकार हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहे. पण विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्याचा डावच भाजप सरकारने आखल्याचे दिसते. याआधीही गोवा आणि मणिपूरमध्ये असेच षडयंत्र करण्यात आले होते. आता ते कर्नाटकचे सरकार पाडून भाजपचे सरकार स्थापन करण्याचा कुटील डाव खेळत आहेत. भाजपने लोकशाहीची क्रूर थट्टा चालवली आहे, असेही चव्हाण म्हणाले.