बुलडाणा - दीड महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात सरासरी 48.57 टक्के मिलिमीटर पाऊस पडला असून जिल्ह्यातील लहान-मोठया 105 प्रकल्पात आतापर्यंत 13.60 टक्के जलसाठा जमा झाला आहे. तर मोठा प्रकल्प खडकपूर्णा आणि मध्यम प्रकल्प कोराडीमध्ये मृतसाठाच शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प अद्यापही तहानलेले असून येणाऱ्या काळात दमदार पाऊस झाला नाही, तर पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प असून यात नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पांचा समावेश आहे. तर सात मध्यम प्रकल्प असून ९८ लघु प्रकल्प आहेत. या 105 प्रकल्पात अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा जमा झाला नसून आतापर्यंत फक्त 13.60 टक्के जलसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यात 3 मोठे प्रकल्प असून त्यात नळगंगा 9.17 टक्के, पेनटाकली - 22.08 टक्के जलसाठा असून खडकपूर्णामध्ये 26.23 दलघमी मृतसाठा शिल्लक आहे. तर मध्यम प्रकल्पामधून कोराडी मध्येही 4.00 दलघमी मृतसाठा शिल्लक आहे.
मागील वर्षी या वेळेपर्यंत जिल्ह्यातील प्रकल्पात 7.2 टक्के जलसाठा जमा होता. यावर्षी त्यापेक्षा जास्त जलसाठा जमा झालेला असला, तरी पाहिजे त्या प्रमाणात पाणी उपलब्ध झालेले नाही. सध्या जिल्ह्यात पाऊस सुरु असून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या 48.57 टक्के मिलिमीटर पाऊस झाला आहे. यात केवळ बुलडाणा शहराला पाणी पुरवठा करणारे येळगाव धरण हे शंभर टक्के भरले असून जिल्ह्याला सध्या तरी दमदार पावसाची वाट आहे.
या प्रकल्पातून बुलडाणा जिल्ह्यातील २५४ गावांना, शहरांना पाणी पुरवठा केला जातो. तर खडकपूर्णा प्रकल्पातून शेकडो हेक्टरवर शेती सिंचनाला मदत होते. तर जालना जिल्ह्यातील 105 गावे आणि शहरांसह बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नगर पालिकेसह काही गावांना पाणी पुरवठा केला जातो. येत्या काही दिवसात दमदार पाऊस पडो आणि हे मोठे प्रकल्प भरो, अशी प्रार्थना सध्या बळीराजा वरूण राजाकडे करत आहे.