बुलडाणा - इयत्ता चौथीत शिकणारा बालयोगी वरद जोशी हा पुलवामा आणि गडचिरोली हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. वरदने राज्यभर योगशिबीर घेऊन योगाचे धडे देण्याचा संकल्प केला आहे. या शिबिरातून मिळणारा पैसा तो वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबाला मदत म्हणून देणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे अवघ्या १० बाय १० च्या घरात 'छोटा रामदेव' अशी ओळख असलेला वरद राहतो. वरद हा सकाळी उठून व्यायाम करतो. टीव्हीसमोर बसून योगा करताना तो आईला आणि लहान भावालाही व्यायाम करायला सांगतो. आई-वडीलही त्याच्या राहण्यापासून ते खाण्यापर्यंत सर्वच बाबींकडे लक्ष देतात. वरदला योगाचे ३५ प्रात्यक्षिके येतात. आतापर्यंत मुंबई ,पुणे, नाशिक, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयसह इतर ठिकाणी ३५० पेक्षा जास्त शिबिरे झाली आहेत. यातून ४ लाख विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले आहेत.
पुलवामा आणि गडचिरोली हल्ल्यात जिल्ह्यातील ४ जवान शहीद झाले आहेत. विविध स्तरातून वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबाना आर्थिक मदत मिळत आहे. मात्र, आपण कुटुंबासाठी काहीतरी केले पाहिजे, आणि त्यात मोठा वाटा आपला असावा म्हणून वरदने राज्यासह राज्याबाहेर होणाऱ्या योग शिबीरातून मिळणारे सर्व पैसे हे जवानांच्या कुटुंबियांना द्यायचा संकल्प केला. वरद जोशीने या कामाला सुरुवात केली आहे. वरदने मागच्या आठवड्यात झोटिंगा गावात सुरू असलेल्या कुस्तीच्या आखाड्यात योग प्रात्यक्षिक दाखवून ४ हजार ८०० रुपयांचा निधी जमवला आहे. जांभोरा येथे योग शिबीर घेऊन दीड हजारांचा निधी जमावला आहे. सिनगाव जहांगीर येथे सुरू असलेल्या लग्नात जाऊन उपस्थित वऱ्हाडी मंडळींना आणि वधूलाही योगाचे धडे दिले आहेत. आतापर्यंत वरदने ७ हजार ५०० रुपयांचा निधी जमा केला आहे.
जमा होणाऱ्या निधीमध्ये पारदर्शका रहावी म्हणून वरदने एक डब्बा तयार केला आहे. याचा सर्व लेखाजोगा एका वहीत मांडण्यात येतो. योग शिबीर आयोजित करणाऱ्या व्यक्तीची सही घेऊन बँकेत निधी जमा केला जात आहे. निधी जमा करणे हा एकच हेतू न ठेवता आरोग्य निरोगी रहावे यासाठीही वरद शिबिरे आयोजित करण्याचा हेतू वरदचा आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
टीव्हीसमोर बसून आज मुले बिघडत असल्याचा गैरसमज दूर करून वरदने रामदेव बाबांची योग पद्धती आत्मसात केली आहे. आता वेगवेगळ्या शिबिरादरम्यान लाखो रुपयांचा निधी उभा करून शहिदांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्याचा संकल्प केला त्याने केला आहे. त्याचा कार्याला सलाम, अशी प्रतिक्रिया कुस्ती स्पर्धा आयोजक नाथाभाऊ दराडे दिली आहे.