बुलडाणा - शेगाव येथे रविवारी रात्री उशिरा सुरू असलेला डीजे बंद करण्याच्या कारणावरून शेगाव पोलीस स्टेशनमध्ये काही जणांनी तोडफोड ( Vandalism at Shegaon police station ) केली. पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले होते त्यांना घेऊन ते पळून गेले.
हेही वाचा - शेगावमध्ये रात्री डीजे न वाजवू दिल्यामुळे नागरिकांनी पोलिस ठाण्यात केली तोडफोड
शासकीय मालमत्तेचे नुकसान करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका महिलेला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
शेगाव पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीने फोनवर माहिती दिली. शेगाव बस आगार डेपोच्या पाठीमागे असलेल्या विश्वनाथ नगर परिसरात डीजे सुरू आहे, या माहितीवरून कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी - कर्मचारी घटनास्थळी गेले. पोलिसांनी डीजे बंद करण्याबाबत सूचना केल्या. मात्र, यावेळी संबंधितांनी पोलिसांसोबत वादावादी केली. मध्यरात्री काही लोक शेगाव पोलीस स्टेशनला महिलांसह दाखल झाले. त्यांनी त्या ठिकाणी वस्तूंची तोडफोड केली व कर्तव्यावरील शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच, शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बळवंत चिंतामण बाभुळकर (वय 28 वर्षे रा. घोडेगाव), भारत अर्जुन बाभुळकर (31 वर्षे रा. विश्वनाथ नगर शेगाव), नरेश अर्जुन बाभुळकर (वय 31 वर्षे रा. विश्वनाथ नगर, शेगाव) सुनील बाबू खंडेराव (रा. कारंजा) यांच्यासह दोन महिला, अशा एकूण सहा जणांविरुद्ध कलम 143, 147, 149, 353, 332, 504 भा.दं.वि सह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेगाव पोलीस स्टेशनला भेट दिली. अधिक तपास ठाणेदार पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ स्वतः करीत आहेत.
हेही वाचा - Governor Visit to Sindkhed Raja : जिजाऊ मातेचे दर्शन घेऊन धन्य झालो - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी