बुलडाणा - महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे पहिले घोषित उमेदवार आमदार बळीराम शिरस्कार आज (शुक्रवारी) दुपारी १२ वाजल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज सादर करतील. विशेष म्हणजे बुलडाणा लोकसभा मतदार संघाचा हा पहिला अर्ज सादर होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शेगाव येथे माळी समाजाच्या एल्गार मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून बाळापूरचे आमदार बळीराम शिरस्कार यांची लोकसभेच्या बुलडाणा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. ते महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे पहिले उमेदवार होते.
शिरस्कार आज मोठे शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बुलडाण्यात वंचित बहुजन आघाडीचे शिरस्कार,भाजप-सेनेचे खा. प्रतापराव जाधव आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
शिरस्कार हे माळी समाजाचे असून बुलडाणा लोकसभेमध्ये माळी समाजाचे निर्णायक मतदान आहे. विशेष म्हणजे खा.प्रतापराव जाधव आणि डॉ.राजेंद्र शिंगणे हे दोन्ही मराठा समाजाचे उमेदवार आहे. यामुळे मराठा समाजाच्या मतांचे विभाजन होण्याची परिस्थिती नाकारता येत नाही.