बुलडाणा Unseasonal rains : शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळं हातचा गेलाय. गेल्या अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर शेतात पिकं आली होती. मात्र, हवामान बदलानंतर झालेल्या मुसळधार पावसाने शेतातली उभी असलेली पिकं पूर्णत: आडवी झालीत. त्यामुळं आता अहोरात्र घाम गाळलेला शेतकरी आम्हाला या पिकाची नुकसान भरपाई नाही मिळाली तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही असं दु:ख व्यक्त करतोय. मोताळा तालुक्यातील आव्हा परिसरात ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. फक्त पाऊसच नाही, तर यावेळी प्रचंड वादळ-वाऱ्यासह पाऊस झाल्याने सर्वच पिकं आडवी झालीत. यामध्ये गहू, तूर, मका, हरभरा या पिकांचं अतोनात नुकसान झालंय.
हेक्टरी २५ हजार रुपये : एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागला नाही. दुष्काळ पडल्यामुळे खर्च देखील निघालेला नाही. तर दुसरीकडे मोठ्या आशेने रब्बी लागवड शेतकऱ्याने केली. त्याला रात्रंदिवस पाणी देऊन फवारा, खते देऊन ती पिकं वाढवलीत. पण त्यांचं नुकसान झाल्यानं आता शेतकऱ्यांनी या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये आम्हाला मदत करावी अशी विनंती केलीय.
सोयाबीन पाठोपाठ नगदी पिकाचेही नुकसान : मोताळा तालुक्यातील आव्हा, तळणी, पिंप्री गवळीसह अनेक गावांमध्ये रब्बी पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. एकीकडे आता काही दिवसांनी म्हणजे मकर संक्रांतीपासून ती किंबहुना सूर्यनारायण आपली चमक दाखवायला सुरुवात करतो. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील अवकाळी पाऊस बळीराजाची पाठ सोडत नाही. कारण गहू आणि मका एक प्रकारे कापूस आणि सोयाबीन पाठोपाठ नगदी पिकाच्या दृष्टीने बळीराजा त्यासाठी झटत असतो. पण ऐन नवीन वर्षातच रब्बी हंगामात देखील पुन्हा एकदा निसर्गाने बळीराजाला संकटात टाकले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.
सातारा जिल्ह्यातही पाऊस : काल गुरुवारी (४ जानेवारी) सातारा जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आणि त्यानंतर रात्री कराड तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारं वाहत असल्यामुळं हा पाऊस झाल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. हवामान बदलाचा आणि पावसाचा एकाचवेळी पिकांना मोठा फटका बसल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी फळबागांचे उत्पादन काढण्यासाठी आलेले असताना, या पावसामुळे पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.
हेही वाचा :
1 हवामान बदलाचा फटका; ऐन थंडीच्या कडाक्यात सातारा जिल्ह्यात पावसाच्या सरी, पाहा व्हिडिओ
2 मराठा समाजाचं मागासलेपण चार दिवसात सिद्ध करण्याचं नियोजन करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
3 आता ८० वर्षाच्या व्यक्तींनी मार्गदर्शन करावे, अजित पवारांचा शरद पवारांना टोला