बुलडाणा - लॉकडाऊनच्या काळात बुलडाण्यातील जिजामाता क्रीडा व्यापारी संकुलमधील जय बजरंग पान सेंटर अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना शुक्रवारी 17 एप्रिलला समोर आली. पान सेंटरमध्ये असलेल्या सिगारेट, तंबाखू, सेंटसह रोख रक्कम असा 50 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस चोरट्यांचा तपास करत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे दुकाने बंद आहेत. बुलडाण्यातील जिजामाता क्रीडा व्यापारी संकुल मधील गाळा क्र.19मध्ये असलेल्या जय बजरंग पान सेंटरचे मालक विनोद देशमुख हे शुक्रवारी 17 एप्रिलल आपल्या घराबाहेर औषधे घ्यायला आले होते. यावेळी पान सेंटरकडून जात असताना त्यांना दुकानाचे शटर तोडल्याचे दिसले. यावेळी त्यांना दुकानातील माल लंपास झाल्याचे ही दिसले. माहिती घेतली असता चोरट्यांनी जवळपास 50 हजार रुपयाचा माल चोरल्याचे समजले. यावरून त्यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस जमादार माधवराव पेटकर करत आहेत.