मुंबई : निवडणूक आयोगानं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिल्यानं राज्य सरकारला मोठी चपराक लागली आहे. त्यामुळं राज्य सरकारनं पोलीस महासंचालक पदाचा पदभार विवेक फणसाळकर यांच्याकडे दिला होता. मात्र, आज महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून संजय वर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगानं पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यासाठी तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं राज्य सरकारकडं मागितली होती. राज्य सरकारकडून ही नावं आल्यानंतर पोलीस महासंचालक पदासाठी संजय वर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
कोण आहेत संजय वर्मा? : संजय वर्मा हे 1990 च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. ते सध्या महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. एप्रिल 2028 मध्ये ते पोलीस सेवेतून निवृत्त होतील. संजय वर्मा हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून त्यांनी बी ई मेकॅनिकलचं शिक्षण घेतलं. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदासाठी ज्या आयपीएस अधिकाऱ्यांची नावं चर्चेत होती, त्यात संजय वर्मा आघाडीवर होते.
Sanjay Kumar Verma, IPS (MH:1990) to be the new DGP of Maharashtra. pic.twitter.com/wvRoMAjqsi
— ANI (@ANI) November 5, 2024
रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी : रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगानं बदली केल्यानंतर आता संजय वर्मा यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप करत निवडणूक होण्याआधी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेसनं केली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामुळं त्या वारंवार वादात अडकल्या होत्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाच्या सांगण्यावरून रश्मी शुक्ला यांनी सरकारसाठी काम केल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा