बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव येथील दुर्गाशक्ती ऑईल मिलमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. शेख मुशीर शेख हनिफ ( 30), शेख इसराल शेख अब्रार (28 ) अशी मृत कामगारांची नावे आहेत. मिल मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.
स्थानिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जवळील ऋषीसंकुलजवळ सुरेका यांची दुर्गाशक्ती ऑईल मिल आहे. या मिलमधील बॉयलरवर वेल्डींगचे काम सुरू होते. बॉयलरमध्ये गॅस जमा झाल्याने अचानक बॉयलरचा स्फोट झाला. स्फोटात चार कामगार गंभीररित्या भाजले होते. यातील शे. मुशीर शे. हनिफ व शे. इसराल शे. अब्रार या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर अन्य दोन जखमींना सर्वप्रथम सिल्व्हर सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.
संतप्त नातलगाचा रुग्णालयात घातला गोंधळ -
बॉयलर स्फोटात जखमी झाल्यानंतर दोन्ही तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त नातलगांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. एवढेच नाही, तर त्यांनी येथे दगडफेकही केली.त्यांना नियंत्रित करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील व शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष ताले हे सामान्य रुग्णालयात दाखल झाले होते.