बुलडाणा - मानव जातीमध्ये आपला जन्मदाता सिद्ध करण्यासाठी डीएनए करण्याची गोष्ट आपण चित्रपटात पाहिले असेल किंवा डीएनए करण्यासाठी न्यायालयाने आदेश दिल्याचे ऐकले असेल मात्र जनावराचा डीएनए केल्याचा ऐकलंय का.. आपण खरं वाचलंय कारण बुलडाण्यात एका तीन वर्षीय वासराचे दोन-दोन मालक म्हणून समोर आले आहे. आपली मालकी सिद्ध करण्यासाठी हे प्रकरण बुलडाणा शहर पोलिसात गेले आहे. पोलिसांनीही वासराचा खरा मालक शोधण्यासाठी शक्कल लढवत बुलडाणा साहाय्यक आयुक्त पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय विभागाला या वासराचे डीएनए करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.
बुलडाणा शहरातील तानाजी नगर, मच्छी ले आऊट येथील पटांगणात दररोज मोकाट जनावरे निवांत आराम करतात. त्या जनावरांमधून ९ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास बुलडाणा येथील इंदिरा नगरातील काही व्यक्तींसोबत अफरोज़ बागबान एका तीन वर्षीय वासराला ट्रकमधून जबरदस्तीने घेऊन जात असताना प्रदीप मोरे यांनी पाहिले. दरम्यान त्यांनी वासरू कुठे नेता? असा प्रश्न केल्यावर अफरोज बागबान यांनी म्हटले हे वासरू माझे आहे. दरम्यान यावेळी प्रदीप मोरे व अफरोज बागवान यांच्यामध्ये वाद झाला मात्र परिसरातील नागरिक गोळा झाल्याने हे वासरू कुणाच्या मालकीचे आहे ते पोलीस ठरविणार असा ठराव झाला.
११ सप्टेंबरला हे प्रकरण बुलडाणा शहर पोलिसात गेले. ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी प्रदीप व अफरोज यांच्याकडे वासराबाबत चौकशी केली असता दोघांनी गे वासरू आमचेच असल्याचे सांगितले. या वासराची आई सोडून आमच्याकडे दुसरे वंशावळ असल्याचे दोघांचे म्हणणे आहे. एका वासरावर दोन जण मालकी दावा करत असल्याने पोलीसही संभ्रमात पडले. यावर शक्कल लढवत ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी या वासराचे दोन्ही मालकी दावा करणाऱ्याजवळील वासराच्या वंशावळीसोबत डीएनए करण्यात येणार आहे. ज्यांच्या वंशावळ सोबत डीएनए जुळतील तो या वासराचा खरा मालक असेल, अशी माहिती वासरावर मालकी हक्क सांगणाऱ्या प्रदीप व अफरोज यांना दिली.
दोन्ही पक्षाकडून या गोष्टीला मान्यता दिल्याचे ठाणेदार साळुंखे यांनी 23 सप्टेंबर रोजी बुलडाणा साहाय्यक आयुक्त पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय विभागाला या वासऱ्याचे डीएनए करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. यावर पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय पशुसंवर्धन विभागाचे साहाय्यक आयुक्त पी.व्ही. सोळंके यांनी सांगितले, की आम्ही 24 नोव्हेंबरला पोलीस विभागाला पत्रव्यवहार करून सुचविले आहे, की ज्या वासऱ्याचे डीएनए करायचे आहे ते वासरू आणि त्याचे वंशावळ आपल्या कर्मचाऱ्यांसोबत पाठवावे. आम्ही त्याचे सॅम्पल घेवून त्याला सील करून आपल्या ताब्यात घेणार आहे. कारण डीएनए तपासणी करण्यासाठी बुलडाण्यात व्यवस्था नाही याची तपासणी हैदराबाद येथे करण्यात येणार आहेत. त्यामूळे डिएनए तपासणीचा निष्कर्षच खरा मालक ठरविणार आहे. डीएनए तपासणी होईपर्यंत या वासऱ्याला येळगाव येथील गोरक्षणात ठेवण्यात येणार आहे.