बुलडाणा - नोकरी लावून देतो म्हणून बुलडाणा ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीला चुलत काका-काकूने पळवून नेत पुण्यात वेश्या व्यवसाय करायला लावल्याची धक्कादायक माहिती बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याचा केलेल्या उलगड्यातून समोर आली आहे. पोलिसांनी सापळा रचून पुण्यातील मांजरी खुर्द येथील यशराज हॉटेल येथून चुलत काका, चुलत काकू व हॉटेल मालक देवराव उंदरे ताब्यात घेवून त्यांच्या तावडीत असलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.
17 जून रोजी चुलत काका-काकूने आपल्या अल्पवयीन मुलीला नोकरीच्या नावाखाली फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली होती. या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
सचिन यादव यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले व पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनात तांत्रिक पद्धतीने प्रकरणाचा तपास केला. यावेळी हा प्रकार वेश्या व्यवसायाशी संबंधित असल्याचा निर्दशनास आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी आपल्या पथकातील पोलीस शिपाई अरुण सानप, महिला पोलीस शिपाई आरती सोनुने यांच्या सह मंगळवारी (दि. 30 जून) रोजी पुण्यातील मांजरी खुर्द येथे गेले. त्या ठिकाणी बनावट ग्राहकाच्या सहाय्याने अल्पवयीन मुलीच्या काकूकडे मोबाईलद्वारे बोलून व्हाट्सअॅपवर अनेक महिलांचे व मुलींचे फोटो मागितले. दरम्यान, या फोटोमध्ये बुलडाण्याहून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा फोटो असल्याचा निदर्शनास आले.
त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या काकूला ताब्यात घेण्यासाठी सापडा रचला व पुण्यातील मांजरी खुर्द येथील यशराज हॉटेलातून रात्री 10 वाजेच्या सुमारास चुलत काका, चुलत काकू व हॉटेल मालक देवराव उंदरे ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपींच्या तावडीत असलेल्या अल्पवयीन मुलीची बुलडाण्यात आणून सुटका केली. या प्रकरणी अटकेतील तिन्ही आरोपींवर अपहरणासह, बलात्काराचा, पॉक्सो, देहविक्रीत ढकलण्याचा पिटा कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस करीत आहे.
हेही वाचा - बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकाला जिल्हाधिकारीच जबाबदार, आमदार फुंडकर यांचा आरोप