बुलडाणा- जिल्ह्यातील शेगाव शहरापासून २१ किमी अंतरावर पुर्णा नदीच्या उजव्या तीरावर भोन हे गाव वसले आहे. डेक्कन कॉलेज, पुणे येथील पुरातत्त्वज्ञ भास्कर देवतारे यांनी 19 वर्षांपूर्वी पूर्णा खोऱ्यात केलेल्या सर्वेक्षणातून या महत्त्वपूर्ण पुरातत्त्वीय स्थळाचा शोध लावला होता. मात्र, आता हे स्तुप सरकार जिगाव प्रकल्पासाठी नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. या विरोधात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने १८ सप्टेंबर(बुधवारी) रोजी शेगावात बौद्ध बांधवांकडून एक संमेलन घेऊन विरोध दर्शविण्यात आला.
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि शेगाव तालुक्याच्या काठावरील पुर्णा नदीच्या काठावर भोन नावाचे गाव आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या डॉ. बी. सी. देवतारे यांनी त्या ठिकाणी सन २००१ साली सर्वेक्षण करून उत्खननाचे कार्य हाती घेतले. त्या ठिकाणी प्राचीन मौर्यकालीन अवशेष असल्याचे त्यांना आढळले. त्यांचे हे उत्खनन कार्य २००६ पर्यंत चालले. तब्बल १५ हेक्टर परिसरात त्यांना मौर्यकालीन प्राचीन अवशेष आढळले. त्यात सम्राट अशोककालीन तथागत भगवान गौतम बुद्धांचा स्तुप आढळला. त्यात खूप प्राचीन बौद्ध प्रतीकेही आढळली. यावरून हे प्रमाणित झाले की तो स्तुप सम्राट अशोकाने बनवलेल्या ८४००० स्तुपांपैकीच एक आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी इरीगेशन कॅनल, तब्बल ३० विहिरी, जुनी वसाहत असलेली घरे व त्यांचे अवशेष सापडले. संशोधन कार्य चालू होते आणि त्या संशोधनातून हे प्रमाणित झाले की ते स्थळ सम्राट अशोक व तथागत बुद्ध यांच्या संबंधातील आहे.
मात्र नांदुरा तालुक्यात उभारण्यात येत असलेला जिगाव प्रकल्पात स्तुप आढळलेली जागा ही पाण्याखाली जाणार आहे. यामुळे ही जागा नष्ट होण्याच्या मार्गावर असून या बद्दल पुरातत्व विभागाने नष्ट करण्यासंदर्भात मंजुरी ही दिली आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आंदोलने सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून बुधवारी शेगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक, म्यानमार चे इंटरनॅशनल नॅशनल बुद्धिष्ट कौन्सिलचे अध्यक्ष भन्ते डॉक्टर यु सदामुनी महाथेरो हे होते. तर बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्रामही यावेळी उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून नॅशनल मायनॉरटी मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी प्रा. विलास खरात यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला राज्यभरातून हजारो समाज बांधव उपस्थित होते.
हेही वाचा- बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरच जप्तीची नामुष्की; अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा भोवला