बुलडाणा - सध्या कोरोना विषाणूची जगभरात धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या भीतीपोटी देशातील पोल्ट्री उद्योग पूर्णपणे रसातळाला गेला आहे. महाराष्ट्रासह बुलडाणा जिल्ह्यातील कुक्कुटपालन करणारे शेतकरी संकटात सापडले आहेत. या संकटकाळी शासनाने पोल्ट्रीधारकांना अनुदान स्वरुपात मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सध्या जगभरात कोरोना विषाणुने दहशत निर्माण केली आहे. दरम्यान, देशात आणि राज्यात कोरोनाची प्रचंड धास्ती वाढली आहे. कोरोनाच्या धाकाने नागरिकांनी चिकनकडे पाठ फिरविली आहे. वास्तविक चिकनचा आणि कोरोनाचा कोणताही संबंध नसतानाही केवळ अफवेमुळे देशभरातील पोल्ट्री उद्योग धोक्यात आला आहे. कुक्कुटपालन व्यवसाय करणारे सर्व शेतकरी आहेत. शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी पोल्ट्री उद्योग शेतात सुरू केला आहे. कुक्कुट पालन व्यवसायात साधारणत: प्रतिकिलो उत्पादन तयार करण्यासाठी किमान ७० रुपयांहून अधिक खर्च येतो आणि सध्या कोंबड्या फुकट घेउन जा, अशी परिस्थिती पोल्ट्री धारकांची झाली आहे.
हेही वाचा - राज्यातील सर्व अन्नपदार्थ विक्रेत्यांना ड्रेसकोड अनिवार्य; बुलडाण्यातून झाली सुरुवात
त्यामुळे पोल्ट्री उद्योग पुरता रसातळाला गेला आहे. ज्याप्रमाणे एखादी आपत्ती येते त्यावेळी बाधितांना सरकारद्वारे मदत केली जाते. त्याच धर्तीवर पोल्ट्री व्यवसायावर आलेली ही आपत्ती पाहता शासनाने पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात आर्थिक मदत करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शिवाय ट्वीट करूनही त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातील मागणी केली आहे. पोल्ट्री व्यवसायिकांना सरकारने मदत न केल्यास राज्यभर कोंबड्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोडू, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
हेही वाचा - टाटा मॅजिक अन् दुचाकीच्या धडकेत २ जणांचा मृत्यू, एक जखमी