बुलडाणा - केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके संसदेमध्ये मंजूर करून घेतली. या विधेयकांना शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे नेते राजू शेट्टी व व्ही.एम.सिंग यांनी आज या विधेयकांच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी बुलडाण्यात पडली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी रात्री बुलडाणा-नागपूर मार्गावर तिन्ही शेतकरी विधेयकांची होळी करण्यात आली. ही कृषी विधेयके आणून केंद्र सरकार हमीभावाच्या कायद्यातून पळ काढत आहे. शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्याच्या दारात उभे करत आहे, असा आरोप रविकांत तुपकरांनी केला. प्रथम शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या आणि मग त्यांना जागतिक स्पर्धेत उतरवा. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारात उभे करणाऱ्या केंद्र सरकारला याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी 'स्वाभिमानी'चे राणा चंदन, पवन देशमुख, शे.रफिक शे.करीम, अनिल पडोळ, ज्ञानेश्वर कल्याणकर, दत्तात्रय जेऊघाले, रामेश्वर पवार, गोपाल जोशी, गणेश इंगोले, लवेश उबरहंडे, आकाश माळोदे, शेख रशीद, बबलू खान, मनोज जयस्वाल, शेख बाबू, इरफान शहा, शेख सोहेल, आसिफ खान, यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.