बुलडाणा - शेगाव नगर परिषदेच्या आवारात प्रवेश करत ४ जणांच्या अज्ञात टोळक्याने दगडफेक करून इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरील भागाच्या काचा फोडल्या आहेत. तसेच तेथील काही जणांना या टोळक्याने शिवीगाळदेखील केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी परिषदेच्या अधिकारी-कर्मचारी संघटनेने पोलीस स्टेशनला निवेदन सादर केले आहे. मात्र नगरपरिषदेच्या वतीने कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तसेच या घटनेतील आरोपींवर कारवाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते.
कामबंद आंदोलनानंतरही कारवाई नाही-
शेगाव नगरपरिषदेच्या इमारतीवर बुधवारी अज्ञातांनी दगडफेक केली. इमारतीच्या आत प्रवेश करून शिवीगाळ केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी दुपारी काम बंद आंदोलन पुकारले व शहर पोलिसात अज्ञातांविरुद्ध निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली. यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय आश्रमा यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मात्र दगडफेक करणाऱ्या विरुद्ध अद्यापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. मात्र, दगडफेकी मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
अज्ञातांनी अशा प्रकारे नगरपरिषेदत येऊन दगडफेक केल्यानंतरही नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्याविरोधात तक्रार दाखल केलेली नाही. तसेच कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलन करून देखील पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. तसेच शेगांव नगरपरिषदेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत का? या प्रकरणाची चौकशी करण्यास दिरंगाई केली जात आहे का? अशी चर्चा आता नागरिकांमधून रंगू लागली आहे.