मुंबई - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू झाल्याने फोटोग्राफर व्यवसाय कोलमडला आहे. त्यामुळे फोटोग्राफर व्यावसायिकांची उपासमार होत आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात लग्न सराईच्या काळात फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी करून लाखो रुपयांची कमाई होत असते. मात्र यावर्षी लग्न सराईच नसल्याने फोटोग्राफर व्यावसाईक प्रचंड अडचणींचा सामना करत आहेत.
नाशकात लॉकडाऊनमुळे छायाचित्रकारांना फटका; फळविक्री करून परिवाराचा उदरनिर्वाह
नाशकात लॉकडाऊनमुळे छायाचित्रकारांना फटका; फळविक्री करून परिवाराचा उदरनिर्वाहकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचा फटका आता येवल्यातील फोटोग्राफी व्यवसायला बसला आहे. उन्हाळ्यात असणारी लग्नसराई ही टाळेबंदीमुळे पूर्णपणे कोणत्याही कमाईविना निघून गेली. त्यामुळे आता अनेक छायाचित्रकार दुसऱ्या व्यवसायाकडे वळताना दिसत असून त्या माध्यमातून परिवाराचा उदरनिर्वाह करत आहे.
प्रवीण डरांगे हे 28 वर्षापासून फोटोग्राफी करत आहेत. मात्र, लग्नसराई निघून गेलीय आता त्यांच्यावर बँकेचे कर्ज असून कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न प्रवीण डरांगे याना पडला व त्यांनी फळ विक्री करण्याचा निर्णय घेतला असून आता सध्या त्यांच्यावर फळ विक्री करण्याची वेळ आली आहे. काही तालुक्यातील व शहरातील छायाचित्रकार हे शेती, कापड दुकानात काम करून तर काही जण मास्क विक्री करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे छायाचित्रकार आता दुसऱ्या व्यवसायाकडे वळताना दिसत असून त्यामाध्यमातून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत असून लॉकडाऊनचा फटका आता येवल्यातील छायाचित्रकार व्यावसायिकांना बसताना दिसत आहे.
कोरोनाचा फटका अमरावतीतील व्हिडिओग्राफी व्यवसायाला, आर्थिक नियोजनावर फेरले पाणी
लग्नाचे सर्वाधिक मुहूर्त असणारा एप्रिल, मे आणि जून हा काळ खऱ्या अर्थाने फोटो आणि व्हिडिओग्राफरसाठी सुवर्णकाळ असतो. यावर्षी कोरोनाने मात्र लग्नाच्या सर्व महूर्तांवर पाणी फेरल्यामुळे अमरावती शहरात आणि जिल्ह्यातील फोटो व्हिडिओग्राफर्स यांच्या वार्षिक नियोजनावरही पाणी फेरले गेले आहे. वर्षभराच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असताना यातूनच सावरायचे कसे, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.
अमरावती शहर आणि जिल्ह्यात लग्नसह इतर सर्व सोहळ्याचे फोटो काढणे आणि व्हिडिओग्राफी या व्यवस्यावर जवळपास 10 हजार जणांचे कुटुंब अवलंबून आहे. हा साखळी पद्धतीचा व्यवसाय असून यात फोटो काढणारे, व्हिडिओ घेणारे, त्यानंतर व्हिडिओची प्रोसेसिंग करणे, एडिटिंग करणे तसेच फोटो प्रोसेसिंग, प्रिंटिंग आणि अल्बम तयार करून देणारे, या सर्वांचे हात या व्यवसायात गुंफले आहेत.
व्यावसायिक छायाचित्रकारांचे काम ठप्प; ऐन लग्न सराईत हाताला काम नाही
नांदेडात व्यावसायिक छायाचित्रकारांचे काम ठप्प; ऐन लग्न सराईत हाताला काम नाही जिल्ह्यात हजारो छायाचित्रकार असून त्यातील शेकडो छायाचित्रकारांची उपजीविका ही फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीवरच चालते. यंदा ऐन लग्न सराईच्या तोंडावर कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने जगभरात थैमान घातले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक छायाचित्रकारांचा व्यवसाय ठप्प असून सर्वच जण चिंतेत आहेत.
यामध्ये छायाचित्रकारांसह, फोटो कलर लॅबमध्ये काम करणारे कामगार, अल्बम डिझाईन करणारे कामगार यांच्यासह अनेक लोकांची सध्या परवड होत आहे. लाखो रुपये कॅमेरा खरेदीत गुंतवून ठेवलेल्या छायाचित्रकारांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. छायाचित्रकारांनाही राज्य शासनाने मदत करावी यासाठी नांदेडच्या फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष रामचंद्र सुर्वे यांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. सर्व व्यावसायिक छायाचित्रकारांना मुख्यमंत्र्यांनी मदत करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
बुलडाणा
लग्न सराईत कोरोनामुळे बुलडाण्यातील फोटोग्राफर व्यवसाय कोलमडला
बुलडाण्यापासून जवळ असलेल्या भादोला या गावात कासम शहा राहतात. त्यांचा बुलडाण्यातील कारंजा चौकात लक्ष्मी फोटो स्टूडिओ आहे. फोटोग्राफर व्यवसाय चालवण्यासाठी महागडे कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, व्हिडिओ काढणारे ड्रोन, एलएडी स्क्रीन, यासह विविध लाखों रुपयांचे साहित्य त्यांनी घेतलेले आहे. हे साहित्य लग्नाच्या कार्यक्रमात लागते. यासाठी कासमने काही बँकेकडून २० लाख रुपये कर्ज काढलेले आहे. तर १५ हजार रुपये महिना किरायाने दुकान भाड्याने घेवून लक्ष्मी फोटो स्टुडिओ नावाने व्यवसाय सुरू केला आहे. स्टुडिओमध्ये पासपोर्ट फोटो काढणे, मॉडेलिंग फोटो काढणे, लग्नाच्या फोटोचे अल्बम बनवणे, लग्नात व्हिडिओग्राफी करणे, अनेक कार्यक्रमात फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी करणे आदी कामे ते करतात.
फोटोग्राफी व्यवसायावर अनेक मजूरदेखील अवलंबून आहेत. कासम शहा यांच्या लक्ष्मी फोटो स्टूडिओमध्ये ५ ते ६ जण ५ ते ६ हजार रुपयांच्या प्रतिमहिने दराने मजुरी करतात. प्रत्येक मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात लग्न सराई चालते. प्रत्येक लग्नात ४० ते ५० हजार रुपयांचे फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, ड्रोनने व्हिडिओ ग्राफीचा व्यवसाय केला जाते. तर काही लग्नसमारंभात एलएडी स्क्रीन ही लावण्यात येते. यामुळे प्रत्येक लग्न सराईच्या काळात फोटोग्राफर व्यावसायिकांचा सगळा खर्च मिळून १५ ते १६ लक्ष रुपयांचा व्यवसाय होते. याच लग्न सराईत फोटोग्राफर व्यावसायिकांच्या हाती जास्त पैसे असतात. मात्र यावर्षी परिस्थिती वेगळी पाहायला मिळत आहे.
या वर्षीच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न सराईत फोटोग्राफर व्यावसायिक अडचणीत सापडला आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या तीन महिन्यापासून लॉकडाऊनमुळे देशासह राज्य बंद करण्यात आले. लग्न कार्य न करण्याचे किंवा गर्दी टाळून लग्न करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. यामुळे या लग्न सराईत फोटोग्राफर व्यावसायिकांच्या हातात येणारा पैसा आलाच नाही. त्यामुळे अनेक फोटोग्राफर व्यावसायिकांसह कासम शहा हे फोटोग्राफर देखील अडचणीत आले आहेत. त्यांच्याकडे असलेले फोटोग्राफर मजुरांना तीन महिन्यापासून त्यांचे मानधन उसनवारी, व्याजाने आणून पैसे द्यावे लागत आहेत. याच व्यवसायावर कासम शहा यांचा मोठा परिवार आणि त्यांच्याकडे असलेले फोटोग्राफर मजुरांचा देखील परिवार अवलंबून आहे. त्यामुळे येणाऱ्या काळासाठी कासम शहा हे चिंतेत पडले आहेत. बँकेचे कर्ज कसे भरावे, मजुरांना महिन्याचे मानधन कसे द्यावे असा प्रश्न त्यांना पडला आहे.
विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असूनही काही दुकान मालकांनी आपल्या भाडेकरूकडून पूर्ण भाडे वसूल केले आहे. मात्र लक्ष्मी फोटो स्टूडिओ दुकानाचे मालक मोहम्मद एजाज यांनी कासम शहा यांच्याकडून ३ महिन्याचे भाडे घेतले नाही. त्यामुळे कासम शहाने त्यांचे आभार व्यक्त केले. शासनाने फोटोग्राफर व्यवसायिकांना मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कोरोनाचा फटका: वाशिममधील छायाचित्रकारांवर ओढावले आर्थिक संकट
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे अमर रोकडे यांचा अमर फोटो स्टुडिओ आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये, पण एखाद्या कार्यक्रमात फक्त पाच जणांना परवानगी असल्याने रोकडे यांना छायाचित्रणासाठी कोणीच बोलवत नसल्याचे चित्र आहे. सांस्कृतिक कार्यक्रमही नसल्याने छायाचित्रकारांकडे कामेच नाहीत. पिककर्ज, स्कॉलरशिपसाठी लागणारे फोटो काढण्यासाठी सुद्धा कोणीच येत नसल्यामुळे रोकडे यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सगळेच काम ठप्प असून वर्षभर काम मिळविण्यासाठी आता छायाचित्रकारांवर वाट पाहण्याची बिकट वेळ आली आहे. छायाचित्रकारांबरोबरच ग्राफिक डिझायनर, फोटो एडिटर यांचे नुकसान झाले आहे. त्यातच कोरोना आजारामुळे यावर्षीचा हंगाम गेला आहे. यामुळे छायाचित्रकार आर्थिक संकटात आले असल्याचे छायाचित्रकार अमर रोकडे यांनी सांगितले.