बुलडाणा - राज्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात मान्सून पुर्व पावसाचे आगमन झाले आहे. यानंतर शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या सुरुवातीस खरीप पेरणीला सुरुवात केली आहे. ७ लाख 38 हजार 500 हेक्टर क्षेत्रात ही लागवड करण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये दोन-तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतीच्या कामाला गती आली आहे. खरीप पेरणी करताना बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर याची पेरणी केली आहे. तर यासोबतच दुसरीकडे कोरोनामुळे शाळांना सुट्टी आहे. यामुळे मुले घरी आहेत. तर मजुरही मिळत नाही आहेत. अशा परिस्थितीत घरातील लहान मुले शेतात काम करताना दिसत आहेत.
सरकारी आकडेवारी नुसार यावर्षी सोयाबीन, कापूस आणि तुरीची लागवड होणार आहे. मागच्या वर्षीचा बाजारभाव पाहून तुरी या पिकाकडे यावर्षी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन या पिकाकडे भर दिलेला दिसत आहे. गेल्या वर्षी सरकारने सोयाबीनच्या भावा संदर्भात हातावर तुरी दिल्या होत्या. यावर्षी सोयाबीनला तरी भाव देईल, या आशेने बळीराजा पेरणी करत आहे.