बुलडाणा- गावतलावासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा आर्थिक मोबदला शेतकऱ्यांना न दिल्यामुळे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर साहित्य जप्तीचे आदेश दिले आहेत. देऊळगाव मही येथील ५ शेतकऱ्यांची शासनाच्या सिंचन विभागाने २००० साली गाव तलावासाठी जमीन संपादित केली होती. त्याचा मोबदला संबंधीत शेतकऱ्यांना न दिल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
देऊळगाव मही येथील शेतकरी संतोष शिंगणे, रंगनाथ शिंगणे, शशिकला मधुकर शिंगणे, अरुण शिंगणे, शेख यासीन यांच्या जमिनी शासनाच्या सिंचन विभागाने सन २०००मध्ये गाव तलावासाठी संपादित केल्या होत्या. १९ वर्षांनंतरही त्याचा मोबदला मिळाला नाही. म्हणून या शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली असता या पाच शेतकऱ्यांना 28 लाख रुपये मोबदला देण्याचे आदेश बुलढाणा न्यायालयाने दिले होते. त्यानंतरही शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे रक्कम न दिल्याने न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्तीचे आदेश दिले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात हजर नसल्याने त्यांच्या कार्यालयातील एक प्रींटर, एक मॉनिटर, एक सीपीयू आणि खुर्ची जप्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे वकील आणि न्यायालयाचे बेलिफ यांनी ही कारवाई केली असून जिल्हाधिकारी कार्यालयावर ही जप्तीची नामुष्की ओढवली आहे.