बुलडाणा - जातीय सलोखा जोपासणे, टिकवणे व वृद्धिंगत होण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात पोलीस दलाच्यावतीने सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याची सुरुवात मंगळवारी 20 ऑगस्टपासून शेगावातून झाली आहे. या परिषदेला सर्व धर्मातील धर्मगुरूंची उपस्थिती होती.
प्रारंभी श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या परिषदेला सुरुवात झाली. जातीय सलोखा व सामंजस्य वृद्धिंगत करण्यासाठी तसेच सामाजिक एकोपा सौहार्दभाव टिकवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने शेगाव येथील वर्धमान भवनमध्ये सद्भावना दिनानिमित्त 20 ऑगस्टला पार पडली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी श्री गजानन महाराज संस्थांनचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील प्रा डॉ शमशोद्दीन तांबोळी, ठाणे येथील सलाउद्दीन शेख, हभप शंकर महाराज, शेलोडी आश्रम, हभप सुशिलमहाराज वनवे, शेगाव प्रा.फादर फिलीप, भन्तेजी बी संघपाल, शेगावच्या नगराध्यक्षा शकुंतलाताई बुच तसेच आयोजक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ-पाटील यांची विचारपीठावर उपस्थिती होती.
प्रास्तविकात पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ-पाटील यांनी सामाजिक ऐक्य परिषद आयोजनाचा उद्देश स्पष्ट केले. भारतीय शिक्षण पाठ्यपुस्तकात पहिल्या पानावर असलेल्या भारत माझा देश आहे या प्रतिज्ञेचे अनुकरण प्रत्येक व्यक्तीने खऱ्या अर्थाने करावे. तसेच जातीय सामाजिक सलोखा अधिक वृद्धिंगत व्हावा, यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.