बुलडाणा - लोणार तालुक्यातील सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारच्या २०१७ च्या जात वैधता प्रमाणपत्राच्या पावतीवर छाननीत आक्षेप नोंदवण्यात आला. परंतु, याची दखल न घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर कारवाई कराण्यात यावी आणि उज्वला प्रल्हाद मोरे यांना अपात्र घोषीत करण्यात यावे, अशी मागणी सागर पनाड यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
लोणार तालुक्यातील सुलतानपूर ग्रामपंचायतची वार्ड क्रमांक ५ मध्ये मागासवर्गीयांसाठी १ जागा आरक्षित होती. या जागेसाठीची पोटनिवडणूक २३ जुनला झाली. यावेळी ५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, ३ अर्ज मागे घेण्यात आले. छाननीच्या वेळी प्रतिस्पर्धी उमेदवार मोरे यांनी आपल्या अर्जासोबत जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाखल केले होते. ५ सप्टेबर २०१७ रोजी दाखल करण्यात आलेल्या अर्जाचा पावती क्रमांक - २३५३१९ ची प्रत लावली होती. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे अद्यावत जात प्रमाणपत्र समितीची प्रस्ताव दाखल केल्याची पावती किंवा समितीचे पत्र दाखल न केल्याने छाननीच्या दिवशी लेखी हरकत घेवून उज्ज्वला मोरे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी लेखी हरकत घेतली होती. हरकत योग्य असताना देखील मोरे यांचे पती भाजपचे पदाधिकारी असल्याने आणि गावातील सत्ताधारी प्रस्थापितांच्या दबावाखाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझी हरकत अमान्य केली, अशी प्रतिक्रिया सागर पनाड यांनी दिली आहे.
पनाड म्हणाले, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळी कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळी विनियमन नियम २०१२ मधील नियम १७(२) नुसार विजयी उमेदवाराच्याच प्रस्तावाची पडताळणी होते. इतर प्रस्ताव खारीज करण्यात येतात, असे पत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळी कार्यालयातून प्राप्त असल्यामुळे सन २०१९ च्या पोटनिवडणुकीत उज्वला मोरे यांची २०१७ ची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील दाखल प्रस्तावाची पावती ग्राह्य होवु शकत नाही. त्यामुळे मोरे यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेली हरकत योग्यच होती. ती हरकत ग्राह्य धरली गेली असती तर केवळ एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली असती. मात्र, लोणार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझ्या हरकतीवर कोणतीही चौकशी न करता मोरे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाचे नियम डावलून खारीज केला नाही.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मोरे यांचा उमेदवारी अर्ज खारीज केला असता, तर मी बिनविरोध विजयी झालो असतो. निवडणुकीसाठी लागणारा पैसा वाचला असता. निवडणुक आयोगाच्या नियमाचा भंग केल्याने लोणार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सागर पनाड यांनी केली आहे.