बुलडाणा - कोरोनाच्या संकटकाळात रक्ताचे नातेवाईकही जवळ येत नाहीत, अशी भयावह परिस्थिती आहे. मात्र अशा भयावह परिस्थितीत बुलडाण्यात माणूसकीचा प्रत्यय आला आहे. पोलिसांनी आपल्या सहकाऱ्यावर सुरू असलेल्या म्युकरमायकोसिस आजारावरील उपचारासाठी तब्बल 30 लाख रुपये जमा केले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या भाईदास माळी यांना दोनदा कोरोना होऊन गेला, व त्यानंतर आता त्यांना म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. मात्र उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याने, त्यांच्या ११३ क्रमांकाच्या बॅचमधील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या उपचारासाठी मदत म्हणून तब्बल 30 लाख रुपये जमा केले आहेत.
उपचारासाठी 35 ते 40 लाखांची आवश्यकता
बुलडाणा जिल्ह्यातील किनगावराजा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भाईदास माळी यांना दोनदा कोरोनाची लागण झाली. त्यांनी कोरोनावर मात केली. मात्र त्यांना त्यानंतर म्युकरमायकोसिसची लागण झाली. त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरू होता, मात्र प्रकृत अधिक चिंताजनक बनल्याने त्यांना सुरुवातीला पुणे आणि नंतर मुंबईला हलवण्यात आले. त्यांच्या उपचारासाठी 35 ते 40 लाखांचा खर्च लागणार असल्याने एवढे पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबाला पडला होता.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जमा झाली मदत
यावेळी त्यांच्या मदतीससाठी किनगावराजा गावातील ग्रामस्थ धावले. ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. याची माहिती त्यांच्या 113 क्रमांकाच्या बॅचमधील अधिकाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या मित्रासाठी तब्बल 30 लाखांची मदत गोळा केली आहे. माळी यांच्यावर सध्या मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान या मदतीमुळे माळी यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - ब्लॅक, व्हाईटसह ग्रीन, रेड, पिंक आणि ब्लू फंगसचाही धोका