बुलडाणा - विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात हजारो वारकऱ्यांनी प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावात आषाढी यात्रेचा अनुपम सोहळा शुक्रवारी अनुभवला. संत गजानन महाराजांच्या पंढरीत आषाढी एकादशी यात्रा सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी उपस्थित होते. संध्याकाळी श्रींच्या मंदिरात आरतीनंतर टाळकर्यांचा भव्य-दिव्य 'रिंगण सोहळा' पार पडला.
गजानन महाराजांनी पंढपुरात भक्त बापूना काळे यांना पाटील वाड्यात (मठात) विठ्ठल रूपात दर्शन दिले. तेव्हापासून जे भक्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यास पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, ते भक्त सरळ गजानन महाराजांच्या पंढरीत येऊन गजानन महाराजांना विठ्ठल रूपात स्मरण करून नतमस्तक होतात.
आषाढी एकादशीला ‘श्री’च्या पालखीचा संत नगरीत दुपारी नगर परिक्रमेने प्रारंभ झाला. संस्थानचे अध्यक्ष नारायणराव पाटील आणि विश्वस्त याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे शुक्रवारी शहरातून दुपारी २ वाजता श्रींची पालखी अश्व, गज, रथ, मेनासह नगर परिक्रमासाठी निघाली असता पालखीच्या अग्रभागी विठोबाची प्रतिमा असलेला गजराज, अश्व, पताकाधारी व विठ्ठलनामाच्या नामघोषात संतनगरी दुमदुमली. यावेळी सोहळ्यासाठी संतनगरीत भाविक भक्तांची मांदियाळी फुलली होती.