बुलडाणा - भारत जोडो यात्रेदरम्यान ( Bharat Jodo Yatra ) आज कॉंग्रेस खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी शेगाव येथील संत गजानन महाराज ( Sant Gajanan Maharaj ) यांचे दर्शन घेतले. संत गजानन महाराज की जय या घोषणेने राहुल गांधी यांनी भाषणाला सुरवात केली. यावेळी ते म्हणाले की विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की यात्रेचा फायदा काय. त्यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे लोकांच्या मनातून भीती काढून टाकणे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे. ज्यातून समाजमनामध्ये पडलेली फूट मिटून जाईल आणि भारत जोडला जाईल.
लोकांमध्ये भीतीचे वातावरण - राहुल गांधी म्हणाले की आपण पाहाल, जिथे तिथे भीतीच वातावरण आहे. भीती आणि हिंसेसोबत फारकत घेऊन प्रेमाने जनतेला बोलले तर लोक जोडले जातात. हाच उद्देश या यात्रेचा आहे. ते पुढे म्हणाले की या प्रदेशात किती शेतकरी लोकांनी आत्महत्या केली आहे. त्याचे काय कारण आहे. हे जेव्हा मी लोकांना भेटलो तेव्हा लोक म्हणाले की शेतमालाला भावच मिळत नाही. हे सुन्न करणारे उत्तर आहे.
विदर्भात पॅकेज दिले - दुसरीकडे अब्जाधीश करोडपतींचे कर्ज मिनिटात माफ होते. मात्र शेतकऱ्यांचे तसे होत नाही. त्यांच्यामागे तगादा लावला जातो. मात्र काँग्रेसच्या सरकारने असे केले नाही, असे राहुल गांधी म्हणाले. विदर्भात आमचे सरकार असताना आम्ही पॅकेज दिले, याची आठवण त्यांनी करुन दिली.