बुलडाणा - बुलडाणा जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळ कशाप्रकारे सुरू आहे, हे एका धक्कादायक प्रकारामुळे समोर आले आहे. चक्क कोरोना टेस्ट न करता खामगावातील खासगी लाईफ लाईन रुग्णालयात शेगावमधील 35 वर्षीय रुग्णाला रेमडेसिवीरचे इजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातच या रुग्णाचा मृत्यू झाला.
दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णाच्या सिटीस्कॅन अहवालामध्ये एचआर सिटी स्कोर हा 25 पैकी 20 आल्यानंतर देखील, प्रोटोकॉल प्रमाणे मृतदेह न देता, सर्वसामान्य आजाराने मृत्यू झालेल्या सारखा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला. धक्कादायक म्हणजे अंत्यसंस्कारानंतर मृत्यू झालेल्या व्यक्तीचे चार नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व प्रकाराबाबत मृत व्यक्तीच्या एका नातेवाईकाने तहसीलदार व जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
जिथे रेमडेसिवीर शासकीय रुग्णालयात उपलब्ध होत नसताना या लाईफ लाईन रुग्णालयात रेमडेसिवीर कसे उपलब्ध झाले असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या सर्व घटनेवर खमगावचे भाजपा आमदार आकाश फुंडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच संबंधित डॉक्टरांचे सरकारशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. रुग्णांच्या जीवाशी अशा प्रकारे खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
नमके काय आहे प्रकरण?
शेगाव येथील 35 वर्षीय सिद्धार्थ दाभाडे नामक रुग्णाला 9 एप्रिल रोजी खामगावच्या लाईफ लाईन रुग्णालयात भरती करण्यात आले होते. रुग्णाला कोरोनाचे लक्षणे असल्यावरही डॉ.आशिष अग्रवाल यांनी आपल्या लाईफ लाईन रुग्णालयात सकाळी भरती केले. त्यानंतर रुग्णांची कुठलीही कोरोनाची टेस्ट न करता उपचार सुरू केले. विशेष म्हणजे सदर रुग्णाला कोरोनाचे औषधोपचार सुरू करून, रुग्णाला ऑक्सिजन न लावता रुग्णाला रेडिसीविर इंजेक्शन देण्यात आले. 9 एप्रिलच्या संध्याकाळी रुग्णांचा एचआर सिटी केल्यानंतर सिटीस्कॅनमध्ये कोरोनाचा 25 पैकी 20 चा स्कोर आल्याचे समोर आले. इतक्यावरही डॉ.अग्रवाल यांनी रुग्णाला उपचारासाठी कोविड सेंटरला न पाठवता आपल्या लाईफ लाईन रुग्णालयातच ठेवले, विशेष म्हणजे या रुग्णालयाची कोविड रुग्णालय म्हणून नोंद देखील नाही. 10 एप्रिल रोजी रुग्णाला रेमडेसिवीर देण्यात आले. यातच दुपारच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप सिद्धार्थ दाभाडे यांचे नातेवाईक डॉ.प्रकाश दाभाडे यांनी केला आहे.
चौकशीसाठी तीन सदस्यांच्या समितीचे गठण
खामगाव सामान्य रुग्णालयाचे निवासी वैदयकीय अधिक्षक निलेश टापरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या प्रकरणाची तक्रार तहसीलदार आणि जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली आहे. घडलेल्या प्रकारची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचे अधिकारी तसेच एका आरोग्य विभागातील अधिकाऱ्याचा समावेश आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
डॉ.आशिष अग्रवाल यांचा प्रतिसाद नाही
दरम्यान घडलेल्या घटनेबाबत डॉ.आशिष अग्रवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. मोबाईलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी मोबाईल कॉल रिसिव्ह न केल्याने त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.