बुलडाणा - गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ शेगाव तालुक्यातील नागझरी जवळील मन नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या अपघातात दोघांचाही मृत्यू झालाय. कोला येथील अनंत नगर परिसरात दोघे वास्तव्यास होते. कल्पेश संजय आमले(वय - 26) व रुपेश संजय आमले (वय - 25) अशी मृतांची नावे आहेत.
कल्पेश आणि रुपेश हे दोन्ही भाऊ घरच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी मन नदीवर गेले होते. यावेळी खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. नदीवर असलेल्या अन्य गणेश भक्तांच्या लक्षात येताच धावाधाव झाली. प्रथम रुपेशला नदी पात्रातून उपस्थितांनी बाहेर काढले. श्वासोश्वास चालू व्हावा, यासाठी पंपिंग करून पाहिले. मात्र शरीराने प्रतिसाद न दिल्याने त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर कल्पेशची शोधाशोध सुरू झाली. सायंकाळी 6 वाजेदरम्यान कल्पेशचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र त्याचाही मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
संबंधित घटनेची माहिती मिळताच बाळापूर तसेच शेगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी पोहोचले असून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे आमले अनंतनगर परिसरात शोककळा पसरली आहे.