बुलडाणा - पेरणी सुरू झाली आहे, मात्र अद्यापही लाखो शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले नाही. पीककर्जासाठी शेतकरी त्रस्त झाल्याच्या अनेक तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडे आल्या होत्या. तुपकर यांनी आज (सोमवार) कार्यकर्ते व शेतकऱ्यांसह विविध बँकांमध्ये धडक देऊन, पीककर्जाच्या अडचणी ऑन द स्पॉट सोडवल्या. यापुढे पीककर्जासाठी टाळाटाळ केल्यास परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी संबंधित बँक व्यवस्थापकांना दिला.
गेल्या वर्षीचा खरीप आणि रब्बी हंगाम अतिवृष्टी व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातून गेला तर यावर्षी कोरोना महामारीने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकले. कृषीमालाला भाव नाही. त्यामुळे आजही कृषिमाल शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यात आता पेरणी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी खते, बि-बियाणे व पेरणीच्या खर्चाची तडजोड करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लाखो शेतकरी पीक-कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांचे दार ठोठावत आहेत. मात्र, विविध कारणे सांगून बँकांकडून पिककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. स्टॅम्प पेपरचा तुटवडा आहे. तसेच काही शेतकरी कर्जमाफी होऊन मृत झालेले आहेत, त्यांच्या वारसांना पीककर्ज दिले जात नाहीत. कर्जमाफीच्या काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे पीककर्ज अडवून धरले जात आहे. नवीन कर्जदारांनाही कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यासह पीककर्जाबाबत शेतकऱ्यांच्या विविध अडचणींच्या तक्रारी रविकांत तुपकर यांच्याकडे आल्या होत्या.
याबाबत रविकांत तुपकर यांनी बुलडाण्यातील विदर्भ कोकण ग्रामीण बँक, इंडियन ओवरसीस बँक, स्टेट बँक विभागीय व्यवस्थापक कार्यालय व देऊळघाट येथील बँक ऑफ महाराष्ट्र आदी बँकांमध्ये धडक दिली. संबंधित व्यवस्थापकांना धाब्यावर धरत त्यांनी जाब विचारला. पिककर्जाच्या प्रश्नावर रविकांत तुपकर आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनी संबंधित बँकांमध्ये तगडा बंदोबस्त लावला होता. रविकांत तुपकारांना पिककर्जाबाबत येणाऱ्या अडचणीचा पाढा वाचण्यासोबतच बँकांकडून शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या वागणुकीबाबत बँक अधिकाऱ्यांची कान उघडणी केली.
विदर्भ कोकण ग्रामीण बँक, इंडियन ओवरसीस बँक, स्टेट बँक विभागीय व्यवस्थापक कार्यालय व देऊळघाट येथील बँक ऑफ महाराष्ट्र आदी बँकांमध्ये खातेदार असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणींचा ‘ऑन द स्पॉट फैसला’ करून पिककर्जाचा मार्ग तुपकरांनी मोकळा करून दिला. पिककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास बँक अधिकाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही यावेळी रविकांत तुपकरांनी संबंधित बँक अधिकाऱ्यांना दिला. बुलडाणा तालुक्यानंतर आता ते मोताळा तालुक्यातील बँकांमध्ये धडक देऊन शेतकऱ्यांच्या पिककर्जासंबंधातील अडचणी सोडविणार आहेत. यावेळी राणा चंदन, पवन देशमुख, आकाश माळोदे, दत्ता जेउघाले, गोपाल जोशी, मोहम्मद साजिद, कडूबा मोरे, मोहन मोरे यांच्यासह बुलडाणा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.