बुलडाणा - स्वतःच्या मुलाने आपल्या घरी स्वस्त धान्य दुकानात येणारा अवैध गहूसाठा केला असल्याची तक्रार वडिलांनी केली होती. यावर खामगाव तहसील विभाग आणि शिवाजी नगर पोलिसांनी संयुक्तरित्या धाड टाकून ३३ पोती गहू जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेला गहू स्वस्त धान्य दुकानाचा आहे की नाही याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, वडिलांनीच मुलाविरोधात तक्रार केल्याने वडिलांचे कौतूक होत आहे.
सुटाळा-बु येथील जयराज नगर येथील रहिवासी मुरलीधर भातखेडे यांनी आपला मुलगा भरत भातखेडे याने घरामध्ये स्वस्त धान्य दुकानातील गव्हाचा अवैध साठा केला असल्याची तक्रार केली होती. यावर आज सोमवारी दुपारी तहसील विभागातील पुरवठा विभागाचे अधिकारी आणि शिवाजी नगर पोलिसांनी संयुक्तरित्या भातखेडे यांच्या घरावर धाड टाकली. या छाप्यात अंदाजे २५ क्विंटल वजन असलेले ३३ पोते गहू घरी आढळून आले. तेव्हा पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला.
काही दिवसांपासून सुटाळा घाटपूरी, सजनपूरी, वाडी या भागात स्वस्त धान्य दुकानदार गोडावून भाड्याने घेवून अवैध धान्यसाठा करत असल्याची कुजबूज सुरू होती. तेव्हा भातखेडे यांच्या तक्रारीवर छापा टाकण्यात आला. जप्त करण्यात आलेला गहू हा स्वस्त धान्य दुकानात येणारा आहे का हे तपासण्यासाठी नमुने पाठवण्यात आले आहेत. याबाबत अधिक तपास सुरू आहे.