बुलडाणा - बुधवारी रात्री जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रसूती कक्ष आणि रुग्णांच्या वॉर्डमध्ये पाणी शिरले. या प्रकारामुळे प्रसूती झालेल्या मातांना आणि इतर रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
काही दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्ष व सामान्य रूग्ण वॉर्डामध्ये गेटच्या व खिडक्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी आत शिरले. साचलेल्या पाण्यामुळे प्रसूती कक्षाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे महिला रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना व वॉर्डातील परिचारिकांना रात्रीच्यावेळी गैरसोयीचा सामना करावा लागला. कोरोनासारख्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला कशा प्रकारे सुविधा मिळत आहेत याचे वास्तव बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील चित्र बघितल्यानंतर स्पष्ट होत आहे.
दरम्यान, काल रात्री झालेल्या पावसामुळे नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्याने काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता होती. मात्र, आता ते संकट टळले आहे.