बुलडाणा - शेगाव येथे काळ्याबाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या तांदळाच्या गोडाऊनवर खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने बुधवारी 13 मेला छापा मारला होता. या कारवाईत तब्बल २०० क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आले होते. त्यानंतर मात्र या प्रकरणात अद्यापही गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. हे धान्य गोदाम राजू देशमुख यांच्या मालकीचे आहे.
या कारवाई प्रकरणात गुन्हे दाखल न होण्याचे कारण जाणून घेतले असता, जो पर्यंत शेगाव तहसीलदार अथवा पुरवठा निरीक्षक तक्रार दाखल करीत नाहीत, तो पर्यंत गुन्हे दाखल करता येत नसल्याची प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे यांनी दिली.
शेगाव-बाळापूर मार्गावरील आनंदसागर जवळील अग्रवाल गेस्ट हाऊसच्या पाठीमागे असलेल्या गोडाउनमध्ये काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी शेकडो क्विंटल तांदूळ ठेवलेले असल्याची माहिती खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने बुधवारी गोडाऊनवर छापा मारला असता, गोडाऊनमध्ये तांदळाचे कट्टे आढळून आले.
या कारवाईनंतर पोलीस पथकाने शेगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी भगत हे यांना याची माहिती देऊन घटनास्थळावर बोलविले. त्याठिकाणी ४१६ तांदळाचे कट्टे म्हणजे २०० क्विंटल तांदूळ असल्याचे निदर्शनास आले. तर गोडाऊन हे राजू देशमुख यांचे मालकीचे असून ते त्यांनी मनोज खंडेलवाल यांना २०१९ मध्ये भाडे कराराप्रमाणे दिले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शेगावच्या तहसीलदार बोबडे मॅडम आणि पुरवठा अधिकारी भगत हे चौकशी करीत आहेत.